Sunday, February 26, 2012

कधी कधी वाटतं ..


कधी कधी वाटतं,
हृदयाला ही असावे एक कुंपण,
जे कोणाला हृदयातल्या नाजूक भावना कधी चिरडू देणार नाही,
जे कोणाला आपलं हृदय कधी हिरावू देणार नाही,
जे कोणालाही, कधीही, उगीचच, सहजच हृदयाला भेटू देणार नाही.

कधी कधी वाटतं,
हृदयाला ही असावे एक आवरण,
जे कोणाला आपलं खरं हृदय कधी दिसू देणार नाही,
अंतरंगातले भाव जपायला मग फार त्रास होणार नाही,
प्रत्येक वेदनेमुळे डोळ्यातून मग अश्रूंची धार वाहणार नाही.

कधी कधी वाटतं,
हृदयाला ही असावे कोणाचे तरी आलिंगन,
किर्र रात्रींचा एकलेपणा मग हृदयाला बोचणार नाही,
बेधुंद स्वप्नांची वाताहत मग हृदयाला दिसणार नाही,
अपयशांची मांदियाळी मग हृदयाला खुपणार नाही.

मग उगीचच वाटतं,
हे सगळं त्याला जमणारं होतं.
पण जर त्याला हे जमून गेलं असतं,
तर आपल्याला काय जमलं असतं?
ना अपयशातून यशाकडे जाण्याची उम्मेद,
ना अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे वेड,
आणि ना नाते-संबंधांच्या गुंफनीची घालमेल.
कुंपणाविनाच तर हृदयाला स्वच्छंदपणा मिळाला,
कुंपणाशिवायच तर मिळाली कलांना भरारी,
आणि विखरून पडलेले हृदयाचे तुकडे वेचुनच तर मिळाली अनुभवांची शिदोरी.

आणि आता वाटतं,
विचारांची ही सगळी आवरणे फेकून द्यावीत,
चिंतांची ती सगळी जळमटे झटकून द्यावीत,
हृदयाला द्यावेत भावनांचे पंख,
आणि एकाच उंच भरारीत,
कुठेतरी जरा हे मन मोकळं करावं.

- परसुराम