Monday, July 16, 2012

इतिहासाची पाटी


चार-सात दशके सरतील आणि आपण ही असू इतिहास-जमा,
मागे राहतील त्या फक्त आठवणी.

काही वर्षे या आठवणी असतील, आपल्या माणसांसाठी मोलाचा खजाना,
आणि मग नकळतच होतील त्या ही, अडगळीच्या कोपऱ्यात रवाना.

हा हा म्हणता शतके लोटतील,
आणि मग शे-पाचशे वर्षांनी कोणीतरी,
इतिहासाची थडगी उकरेल,
काळ्या दगडावरच्या उभ्या आडव्या रेघा मोजेल,
आणि "असे होते आमचे पूर्वज", हे सगळ्या जगाला सांगेल.

आयुष्यात सारा अट्टाहास करायचा - तो एवढ्याचसाठी,
काळाची कितीही धूळ साठली तरी,
इतिहासाच्या त्या पाटीवरती,
आपल्या करामती सरळ राहतील, सुबक वाटतील,
ठळक दिसतील.

- परसुराम

No comments:

Post a Comment